DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ वर्षीय शुभम पवार याचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्यानंतर या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील दोन वैद्यकीय अहवालांमध्ये शुभमचा मृत्यू बुडून झालेला नसून त्याच्यावर मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा निष्कर्ष असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या अहवालांनंतरही संशयितांवर तातडीने कारवाई झालेली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
करंजाडे येथे राहणारा शुभम पवार हा व्हेल्सपुल कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. तसेच तो रोबो पायलट आणि पोलीस भरतीची तयारी करत होता. ६ जुलै रोजी नाईट ड्युटीवरून घरी आल्यानंतर एका मित्राच्या फोनवरून कपॅसिटर बसवण्याच्या कामासाठी तो बाहेर पडला. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता ओवळे परिसरातील एका इमारतीबाहेर शुभमची ॲक्टिव्हा आणि इलेक्ट्रिशियनचे साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले.
याच ठिकाणी शुभमची समीर शेख नावाच्या व्यक्तीसोबत बाचाबाची आणि मारामारी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुभमचा मृतदेह पाण्यात आढळून आला. सुरुवातीला पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आणि त्यानंतर अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
मात्र, जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पहिल्या अहवालात गळा दाबल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. त्यानंतर दुसऱ्या अधिकृत अहवालातही शुभमचा मृत्यू बुडून झालेला नसून मारहाणीनंतर त्याचा मृतदेह पाण्यात टाकण्यात आल्याचे नमूद असल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.
दोन वैद्यकीय अहवालांमध्ये हत्येचा निष्कर्ष असल्याचे सांगूनही संशयितांवर कारवाई न झाल्याने शुभमची आई, बहीण आणि भाऊ यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात स्थानिक प्रभावशाली व्यक्ती किंवा विकासकाचा दबाव आहे का, असा सवालही कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
कुटुंबीयांनी कल्याण येथे पत्रकार परिषद घेऊन शुभमला न्याय मिळावा आणि दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
या प्रकरणी पनवेल शहर पोलीसांशी संपर्क साधला असता, अधिकृत अहवाल प्राप्त झाला असून आरोपी निष्पन्न झाले आहेत. पुढील ४८ तासांत त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, दोन वैद्यकीय अहवालांमध्ये हत्येचा निष्कर्ष समोर आल्यानंतरही कारवाईला विलंब का झाला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शुभम पवारच्या मृत्यूचे नेमके गूढ उकलून दोषींवर कठोर कारवाई कधी होणार, याकडे कुटुंबीयांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.



