DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण,कल्याण/प्रतिनिधी -बंजारा समाजाची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपणारा पारंपरिक बंजारा तीज उत्सव (गौरी) सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा रविवारी कल्याणमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीत आयोजित या सोहळ्यास बंजारा समाज बांधव भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पारंपरिक पद्धतीने तीज उत्सव साजरा करण्यात आला.
विशेषतः अविवाहित मुली व महिलांसाठी आनंद, उत्साह आणि आपुलकीचा हा सोहळा ठरला. यावेळी गायन, नृत्य, एकमेकांचा परिचय तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी उपस्थित बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवत आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. समाजातील महिला व युवतींच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेशही देण्यात आला. याप्रसंगी बंजारा समाज तीज उत्सव कृती समितीचे अध्यक्ष मदन जाधव, यांच्यासह समाजातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.



