DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण येथील बुद्ध विहारासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुद्धभूमी फाउंडेशन आणि बुद्ध विहार बचाव समितीच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुद्ध विहाराच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या लोकशाही व संविधानिक लढ्याला संपूर्ण समर्थन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध विहारासंदर्भातील प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचे केंद्र आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला धर्माचे पालन व प्रसार करण्याचा अधिकार दिला असून, या अधिकारांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहे.
कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुद्धभूमी फाउंडेशन व बुद्ध विहार बचाव समितीच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत संबंधित प्रशासनाने या विषयात संवेदनशीलता दाखवून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच समाजातील सर्व घटकांच्या धार्मिक, सामाजिक आणि संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे सोबत उभा राहील, अशी ग्वाहीही देण्यात आली.
यावेळी कल्याण शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नवीन सिंग यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्ध विहाराच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसच्या या जाहीर पाठिंब्यामुळे या प्रश्नाला आणखी राजकीय आणि सामाजिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



