DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्यातील तालुका तासगाव येथील सौ. सारिका यादव यांच्यावर अचानक ओढवलेल्या गंभीर हृदयविकाराने संपूर्ण यादव कुटुंब संकटात सापडले होते. घरात पती विनायक यादव, वृद्ध सासू-सासरे आणि समोर लाखोंच्या उपचाराचा खर्च… परिस्थिती अशी की, आजाराशी लढायचे की पैशांसाठी हात पसरायचे, असा कठीण प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला होता.
प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर कुटुंबीयांनी कोणताही विलंब न करता त्यांना बेळगाव येथील अरिहंत रुग्णालय येथे दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीच्या उपचारासाठी पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या यादव कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.
याच कठीण प्रसंगी आमनापूर येथील रुपेश भोई यांच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अमित कोळेकर यांचा संपर्क क्रमांक मिळाला. पाडळी (ता. कडेगाव) येथील अमित कोळेकर हे गरजू रुग्णांसाठी तातडीने धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. यादव कुटुंबीयांचा फोन येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
राज्याबाहेरील रुग्णालयांतील प्रकरणांना मंजुरी मिळणे अत्यंत कठीण असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. हजारो प्रस्ताव प्रलंबित असताना हे प्रकरण मंजूर होईल, अशी आशाही कुटुंबीयांनी जवळपास सोडली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमित कोळेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
त्यांच्या प्रयत्नांना अवघ्या दोन दिवसांत यश आले आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून ९० हजार रुपयांची मदत मंजूर झाली. आर्थिक अडचणीत अडकलेल्या यादव कुटुंबासाठी ही मदत म्हणजे अक्षरशः जीवदानाचा आधार ठरली.
“अडचणीच्या काळात फक्त धीर देणारे अनेक भेटतात; पण संकट स्वतःचे समजून धावून येणारी माणसे फार कमी असतात,” अशा शब्दांत यादव कुटुंबीयांनी अमित कोळेकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.



