नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नंदुरबार/प्रतिनिधी – महाराष्ट्रात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. असे असतानाही अजून देखील शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळालेला नाही. अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे यावेळी शेतकऱ्यांनी गहू पेरणीकडे पाठ फिरवल्याने यंदा गव्हाचे उत्पादन 10 टक्क्याने घसरले आहे. त्यामुळे बाजार समितीत गव्हाची आवक ही अत्यंत कमी स्वरूपात सुरू आहे आणि बाजार समितीत गव्हाचे दर कमी असल्याने देखील याचा परिणाम गव्हाची आवक वर झाला आहे.
मार्च महिन्यात 25 हजार क्विंटल गव्हाची आवक झाली होती. गेल्या हंगामाच्या तुलनेत यावेळी 10 हजार क्विंटल आवक कमी झाले आहे. शेतकरी बाजारात गहू विक्रीसाठी आणत नसल्याने यंदाचा गहू हंगाम संथ गतीने सुरू आहे. 2 हजार ते 3 हजार प्रतिक्विंटल दर बाजार समितीत गव्हाला आहे. नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या गव्हाची फेब्रुवारीमध्ये व मार्च महिन्यात काढणी करण्यात आली. आता पर्यंत नंदुरबार बाजार समितीत 25 हजार क्विंटल गहूची आवक झाली आहे. गव्हाचे दर कमी असल्याने शेतकरी बाजारात माल आणत नसल्याचे सांगण्यात आले आहे. शेतीसाठी तसेच गहू पेरणीसाठी लावलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि म्हणूनच शेतकरी गव्हाचे दर वाढण्याची वाट बघत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने गव्हाचे क्षेत्र 28 हजार हेक्टर च्या पुढे गेलेले नाही.शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत गहू पेरणी केली होती. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हाची आता कापणी सुरू आहे परंतु गव्हाला दर नसल्याने घरात ठेवून दरवाढीची वाट शेतकरी पाहत आहेत.येत्या काळात दरांमध्ये वाढ अपेक्षित असल्याने शेतकरी त्या दृष्टीने गहू बाजारात आणण्याच्या तयारीत आहे काही दिवसात बाजार समितीत गव्हाची आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीने सांगितली आहे .



