DESK MARATHI NEWS NETWORK.
रायगड | संघर्ष गांगुर्डे-रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीविरोधात अन्न व नागरी पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे राज्यस्तरीय दक्षता पथकाने गिरवले परिसरात अचानक धाड टाकून विविध कंपन्यांचे १३६ गॅस सिलेंडर जप्त केले. या कारवाईत टेम्पो आणि मोटारीसह अंदाजे १० लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाला अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर नियंत्रक शिधावाटप अधिकारी चंद्रकांत डांगे यांच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील गिरवले येथे अचानक छापा टाकला.
या धाडीदरम्यान विविध कंपन्यांचे एकूण १३६ गॅस सिलेंडर अवैधपणे साठवून ठेवल्याचे आढळून आले. पथकाने संबंधित सिलेंडर तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा एक टेम्पो आणि एक मोटार असा अंदाजे १० लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या कारवाईमुळे अवैध गॅस सिलेंडर साठवणूक आणि वितरणाच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे



