मुंबई/प्रतिनिधी – डिजिटल उत्कृष्टता आणि राष्ट्र उभारणीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा गाठत टपाल विभागाने आधुनिक पद्धतीच्या एपीटी (अत्याधुनिक टपाल तंत्रज्ञान) सुविधेची सुरुवात करत असल्याची घोषणा केली आहे. या परिवर्तनकारी उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी उत्तर मुंबई विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये (अंधेरी ते बांद्रा) एक अद्ययावत प्रणाली लागू होणार आहे.
या अत्याधुनिक डिजिटल मंचाच्या वापराच्या दिशेने सुरळीत आणि सुरक्षित स्थित्यंतर होणे सुनिश्चित करण्यासाठी 2 ऑगस्ट 2025 रोजी एक कार्यबंद कालावधी नियोजित करण्यात आला आहे. या दिवशी उत्तर मुंबई भागातील टपाल कार्यालयांमध्ये कोणतेही सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत. नव्या यंत्रणेचे कार्य सुरळीतपणे सुरु होण्याची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने, डाटा स्थलांतर, प्रणाली वैधता आणि जुळवणी प्रक्रिया सुलभतेने होऊ शकण्यासाठी सेवांची ही तात्पुरती स्थगिती अत्यावश्यक आहे.
टपाल सेवेतील कार्ये अधिक अद्ययावत तसेच अधिक कार्यक्षम करण्याच्या बाबतीत टपाल विभागाच्या अढळ बांधिलकीचे प्रदर्शन घडवत सुधारित वापरकर्ता अनुभव, वेगवान सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही दृष्टीकोनासह सेवा देण्यासाठी या एपीटी सुविधेची रचना करण्यात आली आहे.



