नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बहुचर्चित निवडणूक रोख्यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वांत जास्त लाभ भाजपला झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर तृणमूल काॅंग्रेस, काॅंग्रेस यांचा नंबर दिसून येत आहे. या सर्व घडामोडीवर माध्यमांवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया एक्स हॅंडलवर नोंदवली असून, त्यांनी केंद्र सरकारची 2018 ची इलेक्टोरल बाँड्स योजना देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा ठरला आहे; भाजपने इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून एकूण 6 हजार 60 कोटी रुपये कमावल्याची टीका केली आहे. तसेच, आता भाजप-आरएसएस सरकारने कंपन्यांना इलेक्टोरल बाँड्ससाठी काय ऑफर दिली हे पाहणे मनोरंजक ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारची पोलखोल करताना, निव्वळ नफ्यामध्ये 215 कोटी असलेल्या कंपनीने 1 हजार 368 कोटींचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणे कसे शक्य आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, निव्वळ नफ्यामध्ये फक्त 10 कोटी असलेल्या आणखी एका कंपनीने 185 कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. घोंचू मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आणि त्यांच्या भ्रष्ट गुंडांना तुरुंगात टाकले पाहिजे असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.



