नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्याहस्ते ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीचा छट घाट (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला. याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले. बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.
या परियोजनेच्या अंतर्गत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यामध्ये रायलादेवी तलाव, वागळे इस्टेट, ठाणे; काचराली तलाव, ठाणे (पश्चिम); अगासन व गणेश नगर तलाव, दिवा; हार्ट लेक तलाव, ओवळा, ठाणे (पश्चिम); न्यू शिवाजी नगर तलाव, कळवा (पश्चिम); उत्तन खाडी, भाईंदर या व्यतिरिक्त नवी मुंबईतील सागर विहार, वाशी; गणेश विसर्जन तलाव कोपरखैरणे; गणेश विसर्जन तलाव, ऐरोली; तुर्भे एपीएमसी येथील वॉटर बॉडी, पामबीच खाडी किनारा, घणसोली मुर्बादेवी खाडी किनारा तसेच डोंबिवलीतील मोठागाव गणेशघाट रेतीबंदर, आगासन व गणेश नगर तलाव, दिवा; ठाकुर्लीतील कुंभारखान पाडा गणेश घाट, गोग्रासवाडीतील गणेश तलाव, भिवंडीमधील वऱ्हाळदेवी तलाव, कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलाव, आधारवाडी जेल तलाव, कल्याण पूर्वेतील नांदिवली तलाव, द्वारली गाव तलाव, भाल गाव तलाव, अंबरनाथ बदलापूर येथील वडवली तलाव, वासिंद येथील भातसा नदी गणेश विसर्जन घाट, तानसा नदी परिसर, कसारा येथील कसारा तलाव, कल्याण मुरबाड रोड वरील रायते ब्रिजजवळील उल्हास नदी परिसर, टिटवाळा येथील गणपती मंदिर तलाव, मुरबाड सावर्णे येथील काळू नदी परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
तर विठ्ठलवाडी परिसरात प्रभात फेरीच्या माध्यमातून ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाची जनजागृती करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात एकंदर सुमारे 8 हजार निरंकारी भाविक व सेवादल सदस्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या व्यतिरिक्त मुंबई महानगरामध्येही सुमारे 25 ठिकाणी ही मोहिम राबविण्यात आली.
ठाणे शहरातील स्वच्छता कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले. त्यामध्ये प्रामुख्याने आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मध्य प्रदेशमधील जिल्हाधिकारी नवजीवन पवार, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आदिंचा समावेश होता. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलाव येथे केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी स्वच्छता अभियानास भेट देत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे बदलापूर येथे नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील उपस्थित राहून मिशनच्या उपक्रमाची प्रशंसा केली.
या परियोजनेमध्ये जास्तीत जास्तीत युवावर्गाचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमामध्ये केवळ पर्यावरणपूरक उपकरणांचाच वापर करण्यात आला. प्लास्टिक किंवा थर्माकॉल इत्यादिंच्या वस्तू पूर्णपणे वर्जित होत्या.



