नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू असून कल्याण लोकसभा मतदार संघात गणेश कदम यांनी मराठा समाजाकडून उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गणेश कदम हे मनसेचे डोंबिवली शहर सचिव या पदावर कार्यरत होते परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी काही महिन्यापूर्वी त्यांनी मनसेच्या शहर सचिव पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगेची साथ दिली. मनसेचे संपर्क अध्यक्ष असताना त्यांनी २०१९ साली गुहागर विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात देखील आमदाकीची निवडणूक लढवली आहे.
यापूर्वीही गणेश कदम यांनी मराठा आरक्षणासाठी सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवता यावा व समाजातील गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी कल्याण लोकसभा लढवण्याची इच्छा असल्याचे कदम यांनी सांगितले. लोकसभेतील अनेकांनी फोन करून शुभेच्छा दिल्याचे कदम यांनी सांगितले. लवकरच अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील याची भेट घेणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.