नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – शिरपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बैलबाजारातून 2 बैलांची चोरी करून बैलांसह पसार झालेल्या चोरट्यांना शोध पथकाने मोठ्या शिताफीने धुळे येथील बाजारातून 12 तासाच्या आत चोरीस गेलेल्या 2 बैलासह चौघांना ताब्यात घेतल्याची उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी मंगळवारी सकाळी दिली.
शिरपुर कृषि मार्केट मधून दोन बैलांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी ढाबापाडा येथील सुन्नीराम पावरा या बैल मालकाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शोध पथकाने धुळे येथील बैल बाजारातून संशयीतांना बैलांसह ताब्यात घेतले.
संशयितांना न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या हस्ते बैल मालकाला सदर बैल देण्यात आले.बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यास बैल जोडी परत मिळाल्याने बैल मालकाने पोलिसांचे आभार मानले.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली आहे.



