नेशन न्यूज मराठी टीम.
धाराशिव / प्रतिनिधी – तेरणा धरणातून पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तेर, ढोकी, येडशी, तडवळा ही चार गाव पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाईपलाईन सह राबवली. चढ उताराच्या गावात ही योजना व्यवस्थित न राबल्याने ग्रामपंचायतीने ती ताब्यात घेतली नाही. त्यामुळे ग्रा. प. पाणीपट्टीपेक्षा ५ पट प्राधिकरण पाणीपट्टी थकली आहे.
परिणामी वीजबिलामुळे ही योजना बंद पडली. पुढे शासनाने वीजबिल माफ करत ही योजना चार ग्रामपंचायतीत सुकाणु समिती स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग केली. मात्र अंतर्गत अडचणी कायम राहिल्या. हस्तांतरित करताना किमान सहा महिने योजना जीवन प्राधिकरणाने चालवून दाखवण्याची अट असल्याचे सुकाणु समितीचे श्रीमंत फंड यांनी सांगितले. प्रशासनाच्या या खेळात जनता भरडत असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन देवकते व आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली आज तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सध्या ही योजना सुकाणु समितीकडे असुन यंत्रणेच्या वस्तू चोरीला गेल्याने समितीने त्या वस्तु दिल्यास योजना सुरू होईल, असे म्हणत अंग झटकले आहे. तर समिती त्यासाठी प्रयत्न करत असून तीन महिन्यांत योजना सुरू करू असे सांगण्यात आले आहे. मात्र योजनेच्या पाईपलाईमधून कसं व कधी पाणी मिळणार हे पाहणे आवश्यक आहे. मात्र तीन महिन्यांत ही योजना चालू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा रासप व आपने दिला आहे.



