नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – तलाठी परिक्षा घेणाऱ्या टी.सी.एस. कंपनीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच परीक्षेत खोळंबा घातल्याने विद्यार्थ्यांना कंपनीकडुन भरपाई देण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी आज युवासेनेतर्फे करण्यात आली. याबाबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करीत लक्ष वेधण्यात आले.
राज्यात १४ सप्टेंबरपर्यंत तलाठी भरती घेण्यात येत आहे. २१ ऑगस्टला राज्यात धुळे जिल्हासह अनेक ठिकाणी परिक्षा घेणाऱ्या टि.सी.एस. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तसेच तंत्र अथवा व नियोजन शुन्य बेफिकीर तसेच आवश्यकतेनुसार योग्य त्या संसाधनांचा पुरेसा वापर न केल्याने परीक्षेचा खोळंबा झाला. विद्यार्थीनी केलेल्या अभ्यासावर व मेहनतीवर पाणी फेरण्याची वेळ आली आहे. कोट्यावधी रुपयांचा शुल्क आकारुन देखील टि.सी.एस. कंपनी आश्वासीत केल्याप्रमाणे योग्य दर्जाची सुविधा देण्यास असमर्थ झाली आहे. त्यामुळे टि.सी.एस. कंपनीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
तसेच कंपनीकडुन विद्यार्थ्यांना भरपाई देणे आवश्यक आहे. टि.सी.एस. कंपनी परीक्षा घेण्यास असक्षम असल्यास ही परीक्षा घेण्यास योग्य त्या सक्षम कंपनीस परिक्षा घेण्याचे कंत्राट द्यावे. यापुढे प्रलंबित असलेल्या परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. मागणी केल्याप्रमाणे कारवाई न झाल्यास युवा सेना रस्त्यावर उतरुन जनआंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.



