DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – अहमदाबाद-लंडन विमान अपघातात एअर इंडिया विमानातील केबिन क्रू रोशनी राजेंद्र सोनघरे या डोंबिवलीत राहणाऱ्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.या विमान अपघाताच्या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे.
एअर इंडिया मध्ये “केबिन क्रू मेंबर” पदावर काम करणाऱ्या रोशनी राजेंद्र सोनघरे ही तरुणी डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथील ‘नव उमीया कृपा’ इमारती मध्ये राहत होती.वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश असे एकत्र राहत होते. तिने अंधेरी येथून एअर होस्टेस म्हणून प्रशिक्षण घेतले होते दीड वर्षापूर्वी एअर इंडियामध्ये केबिन क्रू पदावर रुजू झाली होती. गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले, ज्यामध्ये एअर इंडियाच्या क्रू मेंबर रोशनी सोनघरे यांचाही मृत्यू झाला. रोशनीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे आणि ती राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.