DESK MARATHI NEWS NETWORK.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबई आणि उपनगरांमधील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने 13 ऑगस्ट 2025 रोजी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) मुख्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडी मुंबई अध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई यांच्या नेतृत्वाखाली झाले.
मुंबईतील SRA प्रकल्पग्रस्तांना घेऊन वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेशच्यावतीने एसआरए कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या ताकदीमुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकावे लागले. अनेक बहाणे बनवल्यानंतर अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.
पुढील आठवड्यात एसआरएचे अधिकारी आणि वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे. प्रकल्पग्रस्तांना तातडीने न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. जर एसआरए आपल्या आश्वासनावर ठाम राहिली नाही तर वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश याहून मोठे आंदोलन करेल! इथल्या शोषित, पीडित, वंचित समाजाच्या भावनेसोबत सरकारला आणि प्रशासनाला खेळू देणार नाहीत, असा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला.
या आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या होत्या ―
1. रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत.
2. भाडे थकबाकीची भरपाई तात्काळ करावी.
3. गैरवर्तन करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी.
4. असक्षम बिल्डरांना बदलून सक्षम बिल्डर नेमावेत.
5. झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन वेळेत व योग्य ठिकाणी करावे.
6. 6. प्रकल्पांची प्रगती SRA ने पारदर्शकपणे जाहीर करावी.
7. स्लम घोषित न झालेल्या वस्त्यांना स्लम म्हणून मान्यता द्यावी.
8. बिल्डर-अधिकारी मिलीभगत रोखावी.
9. 9. गरज असल्यास शासनाने प्रकल्प ताब्यात घ्यावेत.
10. प्रत्येक सोसायटीच्या तक्रारीनुसार कारवाई करावी.
यासह अनेक मुद्द्यांचे निवेदन झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. महेंद्र कल्याणकर यांना देण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी वंचित बहुजन आघाडीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, प्रकल्प मार्गी लागेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.



