DESK MARATHI NEWS.
भिवंडी/प्रतिनिधी – अंजुर फाटा काल्हेर ठाणे रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग,एमएमआरडीए व मेट्रो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच गटार व्यवस्थापन नसल्याने गटारातील पाणी रस्त्यावर साचल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शुक्रवारी या महामार्गाची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात रस्त्यावर काल्हेर,पूर्णा,हॉली मेरी स्कुल अंजुर फाटा परिसरात रस्त्याच्या बाजूला गटार व्यवस्थापन नसल्याने व जुने नाल्यांचे प्रवाह बांधकाम व्यवसायिकांनी बंद केल्याने या महामार्गावर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही व गटारीचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे खासदार बाळ्या मामा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह,एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले.या महामार्गांवरील गटाराचे व्यवस्थापन व रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात दखल घेऊन प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासदार बाळ्या मामा यांना दिले आहे.
अंजुर फाटा काल्हेर रस्त्याची दुरावस्था झाली असून या दुरावस्थेला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीए व मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरावस्तेकडे व गटार व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यात पावसाळ्यात चार महिने रस्ता बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता असून आजच्या पाहणी दौऱ्यात दर्शविलेल्या कामांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी दिला आहे.



