DESK MARATHI NEWS.
नाशिक/प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील निरंतर शिक्षण विद्याशाखा आणि हरियाणास्थित फा-रा-डे ईगॅरेजेस प्रा. लि. यांच्यात ई-मोबिलिटी अर्थात प्रामुख्याने ‘ई-वाहनांची देखभाल’ यावर प्रगत शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार विद्यापीठात स्वाक्षरित करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व फा-रा-डे कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राहुल सिंगल व ऑनलाईन माध्यमातून सहयोगी जपानी कंपनी शिगेरू नाकागावा यांची प्रतिनिधी म्हणून मेईजी सांग्यो यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. सोनवणे म्हणाले की या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट हे ई-मोबिलिटीच्या क्षेत्रातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उद्योगाच्या गरजांनुसार ‘ई-वाहनांची देखभाल’ यावर प्रगत शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे आणि सुरू करणे हे आहे. फा-रा-डे ही ई-मोबिलिटी संबंधित प्रगत प्रशिक्षण प्रदान करणारी खाजगी संस्था असून मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापित आहे, ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमाणपत्र ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध शैक्षणिक कार्यक्रम प्रदान करणे आहे.
विकसित भारतासाठी व्यावसायिक मनुष्यबळाची क्षमता वाढवणे आणि आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करणे या समान ध्येयाने हा करार करण्यात आल्याची पुस्ती मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी शेवटी जोडली. फा-रा-डे कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राहुल सिंगल म्हणाले की या करारामुळे महाराष्ट्रात ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे. या करारानुसार ‘ई-वाहने देखभाल’ यावरील प्रगत शिक्षण – प्रशिक्षण फा-रा-डे द्वारे प्रदान केलेल्या वर्ग सत्रांद्वारे, ई-लर्निंग माध्यमातून व्यावहारिक प्रशिक्षणाद्वारे किंवा या दोन्हींच्या संयोजनाद्वारे हा शिक्षणक्रम राबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी विषयानुसार शिक्षणक्रम साहित्य निर्मिती, प्रशिक्षण पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक समर्थन, तज्ज्ञ मार्गदर्शक – प्राध्यापक उपलब्धता, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा, मुल्यांकन व प्रमाणीकरण यावर चर्चा करण्यात आली. तसेच या सामंजस्य करारानुसार कार्य करण्यासाठी लवकरच एक द्विपक्षीय समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे.
यावेळी जितेंद्र मोटर्सचे (नाशिक) मुख्य व्यवस्थापक संदीप बोरसे, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. सुरेंद्र पाटोळे, माधव पळशीकर, डॉ. सज्जन थूल, डॉ. रश्मी रानडे, डॉ. हेमंत राजगुरू, डॉ. अभिषेक भागवत, प्रा. कैलास मोरे, डॉ. माधुरी खर्जुल, श्रीमती सुजाता मोरे, मनोहर पवार उपस्थित होते.



