DESK MARATHI NEWS.
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – आजच्या धावत्या जगात मानवाला अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. त्यात तरुण पिढी वाढत्या स्पर्धेत लवकरच नैराशाला बळी पडू अंमली पदार्थाच्या व्यसनाला बळी पडत आहे. ही तरुण पिढी उद्याचे देशाचे भविष्य आहे. आणि तीच जर अंमली पदार्थाच्या व्यसनाला बळी पडली तर हे देशाच्या भविष्यासाठी मारक आहे. याच पिढीचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न कल्याण पोलिसांनकडून होताना दिसत आहे.
कल्याण येथील बिर्ला कॉलेज येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त खडकपाडा पोलीस स्टेशनचे वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांचे नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर वेळी कार्यक्रमात अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव हे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले मी देखील कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो ,मी देखील कॉलेजमध्ये धमाल केली, मस्ती केली परंतु माझ्या आय.पी.एस होण्याच्या ध्येया पासून लक्ष विचलित होऊ दिले नाही त्यामुळेच आज मी तुमच्यापुढे आय.पी.एस म्हणून उभा आहे. आयुष्यात नशा करा पण ती अंमली पदार्थांची नाही , तर उच्च ध्येयाची करा . अमली पदार्थाची कीक मारण्यापेक्षा, फुटबॉलला किक मारा. फुटबॉलची किक तुमचं आयुष्य उजळून टाकेल पण अंमली पदार्थांची किक तुमचं आयुष्य जाळून टाकेल म्हणून अमली पदार्थां पासून दूर राहा असे संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले .
यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करून उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ नरेशचंद्र , प्राचार्य अविनाश पाटील , दिशा फाउंडेशन संस्थेचे संस्थापक डॉ राजेंद्र कुऱ्हाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केली.यावेळी त्यांनी पोलीस विभागातर्फे कल्याण डोंबिवली परिसरात पदार्थ विरोधी करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली.
अमली पदार्थ विरोधी जनजागृती करिता खडकपाडा सर्कल ते बिर्ला कॉलेज पर्यंत अशी मुथा कॉलेज, सोनवणे कॉलेज ,आणि बिर्ला कॉलेज या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची व पोलीसांची पायी रॅली आयोजित करण्यात आली होती. बिर्ला कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणारा मूक अभिनय ॲक्ट सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सदर वेळी उपस्थित ७०० ते ८०० विद्यार्थ्यांसह सर्वांनी सामुदायिक अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली. तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या नशा मुक्तीवर आधारित ई पोस्टर्स चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अजिता घोडेगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. किशोर देसाई यांनी केले . उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोहराचे वाटप करून सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




