DESK MARATHI NEWS NETWORK.
भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भिवंडी ते नवी मुंबई कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या कार रॅलीला स्थानिक भूमिपुत्रांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिक या कार रॅलीत सहभागी झाले होते.
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी सुरुवातीपासूनच ठाणे, रायगड,पालघर,मुंबई,नवी मुंबई भूमिपुत्र आगरी कोळी समाज सुरुवातीपासून आग्रही आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असताना केंद्र शासनाकडून याबाबत अजूनही चाल ढकल केली जात आहे यामुळे समजता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया यावेळी खा.बाळ्या मामा यांनी दिली आहे.
विमानतळास स्व.दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी,केंद्र सरकारला जागे करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ठाणे व रायगड जिल्ह्यातून या चांगला प्रतिसाद भूमिपुत्रांसह बहुजन समाजाचा मिळाला आहे.आम्हाला खात्री आहे या आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेऊन तत्काळ नामकरण करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल.या मध्ये केंद्र सरकारने काही काळेबेरे केल्यास हा लढा अधिक तीव्र करून उद्घाटन सोहळा होऊ देणार नाही असा इशारा खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी दिला आहे.
या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहरावतीने अध्यक्ष प्रदीप शिर्के यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त करणारे पत्र खासदार बाळ्या मामा यांना दिले.तर या रॅलीत अनेक संस्था संघटनांनी सहभाग घेतला होता.विशेष म्हणजे या रॅलीचे तालुक्यातील मानकोली,हायवे दिवे पाठोपाठ खारेगाव,कळवा, विटावा या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांनी जल्लोषात पारंपरिक वेशभूषेसह महिलांनी कोळी नृत्य सादर करून स्वागत केले.
या रॅलीत ठाणे जिल्ह्या तील ज्येष्ठ नेते आर सी पाटील,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विश्वास थळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. रूपाली कराळे,माजी जिल्हा परिषद सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांसह मोठ्या संख्येने भिवंडी तालुक्यातील बहुजन समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.



