DESK MARATHI NEWS.
भिवंडी/प्रतिनिधी – शहर व ग्रामीण भागातून जाणाऱ्या सर्वच राष्ट्रीय व राज्य तसेच जिल्हा महामार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शहर व ग्रामीण भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याने प्रशासनाचे रस्त्यांकडे लक्ष जावे व नादुरुस्त रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी भिवंडी नागरी जीवित बचाव संघर्ष समितीच्या वतीने २५ जून रोजी दुपारी दोन वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय व वाहतूक शाखा पर्यंत निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भिवंडी नागरी जीवित बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक एड. किरण चन्ने यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी कॉ. सुनील चव्हाण, सलीम सिद्दिकी, मनसेचे चंद्रकांत पाटील, अविनाश पाटील गुरुजी,अजिंक्य गायकवाड,अमोल तपासे,अबुलेस अन्सारी, फाजील अन्सारी,इरफान भुरे,कॉ. विजय कांबळे, नितीन जोशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भिवंडी वाडा महामार्ग, मानकोली अंजुर फाटा चिंचोटी महामार्ग,भिवंडी ठाणे महामार्ग, भिवंडी कल्याण महामार्ग,मुंबई नाशिक महामार्ग यांच्यासह शहरातील मुख्य रस्ते व उड्डाणपूल यांची दुरावस्था झाली असून शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.वाहतूक कोंडीच्या समस्येकडे वाहतूक शाखा,रस्त्यांचे ठेकेदार, व संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत ऍड.चन्ने यांनी केला असून प्रशासनाला जाग आणण्यासाठी सर्वपक्षीय भिवंडी नागरी जिवीत बचाव संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन एड.चन्ने यांनी या पत्रकार परिषदेत केले आहे.
Related Posts



