DESK MARATHI NEWS NETWORK.
भिवंडी/प्रतिनिधी – अंजुर फाटा चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून खड्डे रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.या रस्त्यावर सुप्रीम इन्फ्रा स्ट्रक्चर कंपनीकडून टोल वसुली करण्यात आली होती, मात्र रस्त्याची योग्य देखभाल दुरुस्ती न केल्याने सुप्रीम कंपनीला टोल बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मागील महिनाभरापासून टोल वसुली बंद असल्याने या रस्त्यावर ना कंपनीचे, ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे असे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. अंजुर फाटा जवळील ७२ गाळा ते कालवार तसेच खारबावच्या पुढे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.
विशेष म्हणजे ठाणे घोडबंदर रस्त्याच्याया दुरुती कामासाठी अवजड वाहनांना याच रस्त्यावरून प्रवेश दिला जात असल्याने या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित चिंचोटी अंजुर फाटा ते मानकोली याचबरोबर भिवंडी वाडा रस्ता येत असून सध्या हे दोन्ही रस्ते न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने या रस्त्यांवर शासनामार्फत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोणतेही दुरुस्ती करता येत नाही अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे भिवंडी उप अभियंता दत्तु गीते यांनी दिली आहे.



