DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते,अधिकारी आणि संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली ९ जुलै २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवसाचा लाक्षणीय संप पुकारण्यात आला. या संपात कल्याण परिमंडळातील कृती समितीच्या सर्व संघटनाचे सभासद १००% उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. देशभरातील सार्वजनिक कंपन्याचे खाजगीकरण केंद्र व विविध राज्य सरकार करत असल्याने ,९ जुलै रोजी देशभरातील २७ लाख वीज कर्मचारी नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ एम्प्लॉईज अँड इंजिनिअर्स यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणा विरोधात संपावर होते .कामगार विरोधी कायदे मागे घेण्यासाठी हा संप करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते देखील संपात सहभागी झाले. महाराष्ट्रात सरकारच्या महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात अनेक खाजगी भांडवलदारांनी समांतर परवाने मागितले असून याबाबतची सुनवणी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे २२ जुलैला होणार आहे. तसेच महावितरण कंपनीने २२९ उपकेंद्र खाजगी ठेकेदारांना चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. महापारेषण कंपनीने २०० कोटींपेक्षा जास्त कंत्राटे खाजगी भांडवलदारांना देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय, महापारेषण कंपनीला मार्केटमध्ये शेअर लिस्टिंग कराव असेही राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. महावितरण कंपनीचे जलविद्युत प्रकल्प काही खाजगी संस्थांना देण्याचा घाट सरकारने घातला आहे. प्रलंबित पेन्शन योजना, रिक्त पदे, महावितरण व महापारेषण मधील पुनर्रचना हे सर्व विषय लक्षात घेऊन १३ मुद्द्याच्या मागणीसाठी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन ९ जुलैचा संप राज्यभर झाला. अशी माहिती संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.



