DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी – भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या (भारत सरकार) आणि भारतीय खेल प्राधिकरण (SAI) यांच्या संयुक्त विद्यमाने, डोंबिवलीतील सेंट होली एंजल शाळेत महिलांच्या खेळाला नवी दिशा देणारी एक अविस्मरणीय स्पर्धा पार पडली. खेलो इंडिया ‘अस्मिता’ अंतर्गत आयोजित केलेली ही ८४ वी महिला किक बॉक्सिंग लीग महिला शक्तीचा जोश आणि दमदार सहभाग दाखवणारी ठरली!
या एका दिवसाच्या महास्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील तब्बल ३०० हून अधिक उत्साही विद्यार्थिनी स्पर्धकांनी भाग घेतला. प्रत्येक किकने आणि प्रत्येक मुष्टियुद्धाने (Punch) ‘मी कोणापेक्षा कमी नाही’ हा आत्मविश्वास दाखवून दिला!
लीगचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय सायकलपटू विनोद पूनमिया यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. यावेळी किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार, किक बॉक्सिंग स्पोर्ट्स वेल्फेअर फाउंडेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शुभम मिश्रा, कासा बेला गोल्ड फेडरेशनचे अध्यक्ष योगेश पाटील, पलावा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विवेक चौधरी आणि होली एंजल शाळेचे मुख्याध्यापक बिजॉय उम्मेन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी, किक बॉक्सिंग स्पोर्ट्स वेल्फेअर फाउंडेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शुभम मिश्रा हे महिला खेळाडूंना प्रेरणा देत म्हणाले की “आज या किक बॉक्सिंग रिंगमध्ये जेवढ्या मुली उतरल्या आहेत, त्या फक्त स्पर्धक नाहीत, तर त्या भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या आधारस्तंभ आहेत. प्रत्येक मुलीने ‘अस्मिता’च्या माध्यमातून स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. खेळाने मिळवलेला आत्मविश्वास त्यांना आयुष्याच्या प्रत्येक लढ्यात विजयी करेल! खेलो इंडियाचा हा मंच महिलांना जागतिक स्तरावर चमकण्याची संधी देईल!” क्रीडा संस्कृतीला बळ देणारा आणि महिलांना आत्मसंरक्षणासोबतच व्यावसायिक खेळात उतरण्यासाठी प्रोत्साहित करणारा हा ‘अस्मिता’ लीगचा उपक्रम डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.



