DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/ प्रतिनिधी -डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग मधील एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप या खास महिलांनी स्थापन केलेल्या ग्रुप तर्फे 18 ते 22 जून रोजी डोंबिवली ते पंढरपुर सायकलवारी काढण्यात आली होती. पर्यावरण, आरोग्य, पर्यटन, बेटी पढाव बेटी बचाव,असा हा सायकल वारी मागचा उद्देश होता. दिनांक 18 जून रोजी सकाळी सहा वाजता एमआयडीसी मधील गणपती मंदीर येथून दर्शन घेवून निघालेल्या या महिला, पुरुष सायकलस्वारांनी ( विशेष यात काही ज्येष्ठ नागरिक व लहान तरुण मुले होती. ) पाऊस, वारा याची तमा न बाळगता, येणाऱ्या असंख्य अडचणीवर मात करून तीन दिवस ठिकठिकाणी थांबुन व खडतर प्रवास करून 20 जून रात्री पंढरपुर गाठले.
पंढरपुरात रविवार 22 जून रोजी सकाळी खास महाराष्ट्रातील 90 शहरातून आलेल्या अंदाजे साडेचार हजार सायकलस्वारांचा रिंगण सोहळा साजरा करण्यात आला होता. अखिल महाराष्ट्र सायकलवारी, पंढरपुर यांच्या वतीने हे सायकल संमेलन घेण्यात आले होते. यासाठी खास केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे, महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री आणि पालकमंत्री श्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, युटोपियन साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक हे उपस्थित होते. या सर्व सायकलस्वारांनी विठुरायाचे दर्शन घेवून त्याच्या साक्षीने विठु नामाचा गजर करीत हा रिंगण सोहळा पंढरपूरच्या रेल्वे मैदानावर साजरा केला. त्यापूर्वी सर्व सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे नगरप्रदक्षिणा घालून पर्यावरण आणि आरोग्य याच्या संदेश दिला. यावेळी डोंबिवलीतील या सायकल स्वार महिला पुरुषांनी भाग घेवून या पंढरपुर सायकल वारीची यशस्वीपणे समाप्ती केली. त्यानंतर रविवारी 22 जून दुपारी हे 24 सायकलस्वार आणि इतर जण असे मिळून 46 जण बसने पंढरपूर येथून निघून पहाटे सोमवारी त्या सर्वांचे डोंबिवली एमआयडीसी येथे आगमन झाले आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र सायकल वारी, पंढरपुर तर्फे गेल्या एप्रिल/मे मध्ये 50 दिवसात 1000 किलोमीटर अंतर पार करणे असे चॅलेंज दिले होते ते सौ. हर्षल सरोदे यांनी 2799 किलोमीटर सायकलिंग चॅलेंज पार करून महाराष्ट्रातील सर्व महिला सायकलिस्ट मधून आपल्या डोंबिवलीतील हर्षल सरोदे यांचा पहिला नंबर आलेला आहे. त्याची ट्रॉफी देण्यात आली. तसेच बेस्ट इयर अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणुन एव्हरग्रीन सायकल प्रेमी मधून घुमानवारी (पंजाब) ही 23 दिवसात 2678 किलोमीटर केल्या बद्दल ट्रॉफी हर्षल सरोदे यांना देण्यात आली आहे. एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप मधील शोभा चौगुले, मनीषा लहाने व अनघा कुलकर्णी यांनी 50 दिवसात हजार किलोमीटर पार केल्याबद्दल त्यांना मेडल देण्यात आले.
या पंढरपुर सायकल वारीसाठी अध्यक्ष सौ. हर्षल सरोदे, सचिव सुवर्णा राणे, खजिनदार शोभा चौगुले, वर्षा महाडिक, वारी प्रमुख विजय लहाने, नितीन पाटील यांच्या यशस्वी आयोजनेखाली एकूण 46 जण गेले होते. या सर्व सायकलस्वार व इतर जणांचे स्वागत व अभिनंदन डोंबिवलीकरांनी केले आहे. धन्यवाद !