नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असतानाच आता राज्यात राजकीय घडामोडी वाढताना दिसत आहेत. सत्तेसाठी प्रत्येक पक्ष आपली वेगळी रणनीती आखताना दिसत आहे. त्यातच आमदार एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकनाथ खडसे हे लवकरच भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. पुढील १५ दिवसांत मी भाजपात परतणार असल्याची घोषणा आज खडसे यांनी पत्रकार परिषदेतून केली. एकनाथ खडसे म्हणाले की “मी येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये माझा प्रवेश करावा अशी विनंती मी भाजप पक्षाकडे केली आहे. त्या दृष्टिकोनातून बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला बोलावणं आल्यावर मी त्या ठिकाणी जाईल. दिल्लीला माझा पक्षप्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे. उद्या होणाऱ्या सभेसाठी मी मोदींच्या सभेला जाणार नाही, मी अजून पर्यंत पक्ष प्रवेश केला नाही. माझा पक्ष प्रवेश झाल्यानंतर ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असेल त्या ठिकाणी मी जाईल. प्रवेशाबाबत मी रोहिणी खडसे यांच्यासोबत कुठलीही चर्चा केली नाही. रोहिणी खडसे स्वतंत्र आहेत. त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्या विचार मांडण्यासाठी सक्षम आहेत.प्रवेशाबाबत पवार यांच्यासोबत माझं बोलणं झालं नाही.”
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची उत्तर महाराष्ट्रातील ताकद आणखी वाढणार आहे. मात्र त्याचवेळी पक्षांतर्गत गटबाजीतही भर पडणार आहे. कारण खडसे यांचा भाजपचे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते असलेल्या गिरीश महाजनांसोबत मागील काही वर्षांपासून टोकदार राजकीय संघर्ष सुरू आहे. अशातच आज खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर महाजन यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अजून सतांतर पहायला मिळतील. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना नेतेमंडळी जेवढी घाई करतात तीच घाई जनतेच्या हिताचे निर्णय घेताना कुठे जाते असा प्रश्न आज सामान्य नागरिकांच्या मनात येत आहे. निवडुकीच्या तोंडावर पक्षांतरासारखी गोष्ट मोठी नसली तरी ती सामान्य नाहीये. एकनाथ खडसे नेमका का पक्षप्रवेश करणार आहेत ? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे.



