DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – मंगळवारी (२० मे ) सायंकाळी मुरबाड परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने वीज वितरण यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत उच्च दाब वाहिनीचे जवळपास १३ विजेचे खांब आणि २७ लघुदाब वाहिनीचे खांब कोसळले. तसेच मोठी झाडे पडल्यामुळे ५० ते ६० ठिकाणी वीजवाहिन्या जमिनदोस्त झाल्या. अभियंता, कर्मचारी व कामगारांच्या टिमने युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करत रात्री भर पावसात विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन जवळपास २२ हजार ग्राहकाचा विजपुरवठा रात्रीच सुरळीत केला.
महावितरणच्या मुरबाड उपविभागातील परिसरात वादळी पावसाने जवळपास २७ हजार ग्राहकांचा विजपुरवठा बाधित झालेला होता. कर्मचारी व अधिकारी यांनी रात्री भर पावसात त्यातील जवळपास २२ हजार ग्राहकाचा वीजपुरवठा रात्रीच सुरळीत केला. ७ कंत्राटदारांचे ६० कामगार, कर्मचारी व अधिकारी उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अविरत कार्यरत होते. सद्यस्थितीत सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे, बदलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता अनंदा काटकर, मुरबाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष फिल्डवर पोहचून अथकपणे युद्धपातळीवर काम करत दुरुस्तीचे काम पूर्ण करत वीजपुरवठा पुर्ववत केला.