DESK MARATHI NEWS NETWORK.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 ची घोषणा केली. यामध्ये सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, आशिष भेंडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आत्मपॅम्फलेट तसेच नाळ 2 चित्रपटाला स्वर्ण कमल पुरस्कार घोषित झाला आहे.सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जिप्सी या चित्रपटातील बाल कलाकार कबीर खंडारे तर त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोखले आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे नाळ 2 चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.
यावेळी ४० फीचर चित्रपट पुरस्कार, १५ नॉन-फीचर पुरस्कार आणि १ चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. फीचर चित्रपट पुरस्कार निवडीच्या ज्युरीचे नेतृत्व आशुतोष गोवारीकर, नॉन-फीचर ज्युरीचे नेतृत्व पी. शेषाद्री आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन ज्युरीचे नेतृत्व गोपाळकृष्ण पै यांनी केले. २०२३ वर्षामधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फीचर, नॉन फीचर आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन अशा तीन विभागांमध्ये जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार लवकरच प्रदान केले जाणार आहेत.
हिंदी चित्रपट ’१२ वी फेल’ला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ’१२ वी फेल’साठी विक्रांत मेस्सी यांना संयुक्तपणे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार जाहीर झाला. राणी मुखर्जीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट पुरस्कार मराठी दिग्दर्शक आशिष बेंडे यांना जाहीर झाला आहे. आत्मपॅम्फलेट या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – कटहल- अ जॅकफ्रुट मिसरी, सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुदिप्तो सेन, द केरला स्टोरी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी, उलोझुक्कु, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजयराघवन आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर, राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट – सॅम बहादुर पुरस्कार घोषित करण्यात आला.