DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – डोंबिवली स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करावा, या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून केडीएमसी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव सेनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. मात्र, चर्चेदरम्यान आयुक्तांचा संयम ढळल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी करत आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. अखेर पुन्हा चर्चेत आयुक्तांनी फेरीवाला हटविण्याबाबत लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
डोंबिवली स्टेशन परिसरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला मुक्तता करण्यात यावी, या मागणीसाठी उद्धव सेनेचे शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी ११ जून रोजी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनामुळे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, त्यानंतर काहीही कार्यवाही न झाल्याने सावंत यांनी २१ जुलैपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले असून आज दहावा दिवस होता.
आज शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. यात अभिजीत सावंत, सचिन बासरे, महिला पदाधिकारी वैशाली दरेकर, आरती मोकल, मृणाल यज्ञेश्वर, अरविंद बिरमोळे, किशोर मानकामे, अक्षरा पटेल, राहुल चौधरी, धनंजय चाळके, शंकर राऊळ आदींचा समावेश होता. चर्चेदरम्यान आयुक्तांनी महिला पदाधिकारी वैशाली दरेकर यांच्यावर आवाज चढवल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त शिष्टमंडळाने चर्चा सोडून आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
यानंतर आयुक्तांनी पुन्हा चर्चेसाठी बोलावले आणि स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले, अशी माहिती शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी दिली.