DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील मोजे चिकनघर परिसरात असलेल्या शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा गेल्या १३ वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन टायकॉन्स ग्रुपचे सह-संचालक श्रीकांत शितोळे यांनी दिले आहे.खडकपाडा येथील स्प्रिंगटाईम्स क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी टायकॉन्स ग्रुपचे चेतन सराफ, पवन भोसले, संतोष पाटील हे देखील उपस्थित होते.
या प्रकल्पातील सदनिकाधारकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी २ ऑगस्टपासून वायले नगरमधील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या ठोस आश्वासनानंतर त्यांनी ५ ऑगस्ट रोजी उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला.प्रकल्प रखडण्यामागे सरकारी परवानग्या, वेळोवेळी झालेल्या लेआऊटमधील बदल आणि कोरोना काळातील अडथळे जबाबदार असल्याचा खुलासा शितोळे यांनी केला. सुमारे १८ ते २० सोसायट्यांचा एकत्रित पुनर्विकास करताना अनेक अडचणी आल्या असून, त्या सोडवून लवकरच सदनिकाधारकांना हक्काची घरे देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपोषण स्थगित करण्यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी सांगितले की, मुरबाडचे आमदार किशन कथोरे आणि भिवंडीचे आमदार महेश चौगुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उपोषणाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील कॅबिनेट बैठकीनंतर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना पोलिस अथवा म्हाडा मार्फत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.“मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण तूर्तास स्थगित करत आहोत. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचे दरवाजे खुले आहेत,” असा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला.