नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नागपूर/प्रतिनिधी – मेट्रोसिटीमध्ये विक्री करण्यासाठी कारमधून गांजातस्करी करणाऱ्या उत्तरप्रदेशातील दोघांना शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. यशपाल चव्हाण आणि अंकित श्यामवीर सिंग असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 50 किलो गांजासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला विशाखापट्टणम येथून एका कारमधून गांजा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती झाली होती. त्याआधारे पोलिसांनी बेलतरोडी परिसरातील वर्धा मार्गावर सापळा रचला व या कारला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा सापडला आहे. पोलिसांनी आरोपींकडून 50 किलो गांजासह एक कार आणि दोन मोबाइल असा एकूण 17 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत.