DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर लघुदाब वीज ग्राहकांकडे बसवले जात आहेत. कल्याण परिमंडलात आत्तापर्यंत दोन लाख २६ हजार ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर प्रीपेड नाहीत. ज्या ग्राहकांना हे मीटर बसवले जात आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणेच विजेच्या वापरानंतर मासिक बिल दिले जात आहेत. या मीटरच्या माध्यमातून कोणत्या वेळेला किती वीज वापर होतोय, याची अचूक माहिती संबंधित ग्राहक व महावितरणला मिळणार आहे. त्यासोबतच या मीटरचा कोणताही आर्थिक भार ग्राहकांवर पडणार नाही. हे मीटर वीज ग्राहकांच्या फायद्याचेच असून या मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या गैरसमज व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असते. त्यामुळे मीटरचा रिअल टाइम डाटा महावितरणकडे उपलब्ध होतो. त्यामुळे मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती तत्काळ मिळू शकेल. मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही. ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. हे अत्याधुनिक मीटर असल्याने यात ग्राहकाला प्रत्येक तासाचा, दिवसाचा वीजवापर मोबाईलवर पाहता येइल. मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून केंद्र सरकारच्या निधीतून सवलत देण्यात येत आहे.
सध्या महावितरणने सर्व औद्योगिक ग्राहकांना टीओडी मीटर बसवलेले आहेत. त्यानुसार विशिष्ट कालावधीत वीज वापरासाठी महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांना सवलत मिळते. याच धर्तीवर भविष्यात घरगुती ग्राहकांना विशिष्ट वेळी वीजवापर केला तर सवलत देण्याचे प्रस्तावित आहे. यात ग्राहकांचाच फायदा होईल. तसेच हे मीटर बसवल्याचा प्रचलित वीज दरांवर कोणताही परिणाम होणार नाही.
महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाईल टॉवर ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर बसवण्यासाठी ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. परिणामी कल्याण परिमंडलात आत्तापर्यंत विविध वर्गवारीतील २ लाख २५ हजार ९८४ ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. यात नवीन वीज जोडणीसाठी बसवलेल्या ४८ हजार ६६९ टीओडी मीटरचा समावेश आहे.
—
कल्याण परिमंडलात बसवण्यात आलेले टीओडी मीटर:-
कार्यालय नवीन वीजजोडणी बदललेले मीटर एकूण
कल्याण मंडल एक ९,०७३ ४२,५५७ ५१,६३०
कल्याण मंडल दोन १३,७१२ ५३,९३५ ६७,६४७
पालघर ८,४१२ ३३,६५९ ४२,०७१
वसई १७,४७२ ४७,१६४ ६४,६३६
कल्याण परिमंडल ४८,६६९ १,७७,३१५ २,२५,९८४