DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण जवळील मोहने परिसरात सावकाराच्या जाचाला कंटाळून एका रिक्षा चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
कर्ज घेतलेल्या सवकरांकडून माझा खूप छळ होतोय, सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून कल्याण मधील एका रिक्षा चालकाने आत्महत्या केली.या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सावकार व एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,राजू मोरे मयत रिक्षाचालकाचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात सावकार सचिन दळवी आणि एका अज्ञात महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर विजय मोरे असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.विजय मोरे यांनी सचिन दळवी या सावकाराकडून कर्ज घेतले होते. सचिन दळवी आणि एक महिला या कर्जाच्या वसुलीसाठी मोरे यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करत मानसिक त्रास देत होते. त्यामुळे मानसिक तणावातून विजय मोरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
सायंकाळच्या सुमारास विजय मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी विजय यांना घेऊन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यानंतर तपास करत सावकार व त्याच्या महिला साथीदारच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.