नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जालना/प्रतिनिधी – जालना शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीचा फायदा घेऊन चोरांनी चक्क एटीएम मशीनवर हात साफ केला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून लाखों रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांसमोर एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे.
एटीएम चोरीची घटना जालना शहरातील महावीर चौकात घडली. 24 लाख 54 हजारांची रोकड चोरट्यांनी एटीएम फोडून लंपास केली. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले व त्यातील एकूण 24 लाख 54 हजार 300 रुपयांची रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी एटीएमच्या सिसिटीव्ही डिव्हीआर सुध्दा पळवून नेले असून चोरटे सीसीटिव्ही कॕमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती पोलीसांकडून मिळाली. एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरटे चार चाकी गाडीत महावीर चौकात आले त्यानंतर त्यांनी एटीएम मशीन मधील लाखोंच्या रकमेवर डल्ला मारला आणि पाणी वेस मार्गे पुढे निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, उपनिरि.भगवान नरोडे डि, बी ,पथक सदर बाजार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेत पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात कलम 379, 461 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले. पोलीस उप निरीक्षक भगवान नरोडे यांची टीम या घटनेचा तपास करत आहेत. तसेच आरोपींना लवकरच बेड्या ठोकण्यात येतील अशी माहिती सदर बाजार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे.