नेशन न्यूज मराठी टीम.
रायगड / प्रतिनिधी – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक शांततेत पार पडली. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. गेल्या अनेक वर्षापासून या बँकेवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. त्यामुळे 21 जागांपैकी 18 जागांवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा याआधी फडकला होता. उरलेल्या तीन जागांसाठी मतदान घेण्यात आले.
या निवडणुकीत शेकापचे तीनही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आल्याने बँकेवर शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा दिमाखात फडकला. आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आर डी सी सी चे माजी चेअरमन जयंत पाटील यांचे वर्चस्व अबाधित राहिले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा पहिला विजय असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
इतर शेती सहकारी संस्था मतदार संघाच्या एक जागेसाठी आ. जयंत पाटील, महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांसाठी प्रिता चौलकर, मधुरा मधुस्टे रिंगणात होते. या तिन्ही उमेदवारांनी या निवडणुकीत बाजी मारल्याने शेकापच्या एकूण 21 उमेदवारांचा दणदणीत विजय झाल्याने शेतकरी कामगार पक्षाने जल्लोष साजरा केला. बँकेमार्फत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आदींसह लहान मोठ्या व्यवसायिकांना उभारी देण्याचे काम जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांनी केले. त्यामुळेच शेकापला विजयश्री खेचून आणण्यात यश मिळाल्याचे जयंत पाटील म्हणाले.



