DESK MARATHI NEWS.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – लवकरच चालू शैक्षणिक वर्षी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शाळांचे रूप बदलताना दिसणार आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिका चालू वर्षी 5 सेमी- इंग्लिश स्कुल सुरू करणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली. आयुक्त गोयल यांनी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी सांगितले होते की शिक्षणाला व आरोग्याला सर्व प्रथम प्राधान्य असेल आणि त्यांनी त्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या शाळेत जर सेमी- इंग्लिश स्कुल सुरू झाल्या तर गरजू व होतकरू विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षणसाठी फार मोठी मदत होणार आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी एका अधिकाऱ्यास पालक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांकडून शाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली जाईल. शाळांमधील आनंददायी वातावरणासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये BALA पद्धतीचे भित्तीचित्रांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळांची दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच फर्निचर देखील पुरविण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तके व वह्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येतील. त्याचप्रमाणे दप्तर, मोजे, बुट हे देखील देण्यात येणार आहेत.
गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी “निपूण” अंतर्गत प्रार्थमिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेचे डिजिटल मॉनिटरिंग “विनोबा भावे अॅप” द्वारे करण्यात येणार आहे.संबंधित पालक अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या शाळेला नियमितपणे भेट देऊन प्रगतीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांसोबत आढावा बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयुक्त गोयल यांनी दिली.
त्याच बरोबर कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात 24×7 आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, तिथे रात्रपाळीची जबाबदारी उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.सर्व प्रभाग कार्यालयांमध्येही आपत्कालीन कक्ष कार्यरत करण्यात आलेले आहेत.
प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्र आपत्कालीन पथक नियुक्त केले गेले असून, यामध्ये प्रभाग अधिकाऱ्यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थितीत लवकर प्रतिसाद देणे, सुलभ होणार आहे. पावसाळ्यात उद्धवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF टीम महापालिका क्षेत्रात दाखल झाली असून, त्यांच्या स्तरावर देखील जनजागृती केली जाणार आहे. पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली.
त्याच बरोबर पालिकेत होणाऱ्या पद भरतीची माहिती देताना आयुक्त म्हणले की कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 490 पदांची भरती होणार असून, भरती प्रक्रियेबाबत सर्व माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कुठल्याही समस्येसाठी हेल्पलाईन नंबर 0251-2303060 यावर संपर्क साधावा. भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आधारित व TCSच्या माध्यमातून घेतली जाणारी परीक्षा असेल फक्त महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती उपलब्ध करून घ्यावी. नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने बाई रुक्मीणीबाई रुग्णालयात एकुण 10 बेडचे आणि शास्त्रीनगर रुग्णालयात एकुण 5 बेडचे विलगीकरण कक्ष तयार केले असून, महापालिकेकडे आरटीपीसीआर ,ॲन्टीजेन चाचणीसाठी किट्स उपलब्ध असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. कोणत्याही लक्षणांची शंका असल्यास घाबरून न जाता नजिकच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही आवाहन महापालिका आयुक्तांनी केले.