DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – ऐतिहासिक वस्तूंची दुरुस्ती करताना सुध्दा कामात कुचराई पणं करून भष्टाचार केला जातो त्यांना अद्दल घडण्यासाठी कल्याण पश्चिमेतील आमदार सरसावले आहेत
.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत काही आठवड्यांपूर्वी कोसळण्याची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार भोईर साहेब यांच्यातर्फे औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही मागणी करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
कल्याण नगरीतील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला हा केवळ एक वास्तू नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे ते एक प्रतीक आहे. याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना केली होती. त्यामुळे केवळ केवळ इतिहास संशोधक आणि गडप्रेमींच्याच नव्हे तर इथल्या सामान्य नागरिकांच्या मनातही या दुर्गाडी किल्ल्याविषयी विशेष आस्था असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी सभागृहात सांगितले. तर काळाच्या ओघात हा किल्ला जीर्ण झाल्याने राज्य सरकारकडून त्याची डागडुजी आणि नूतनीकरणाचे काम केले जात आहे. यासाठी कोट्यवधींचा निधीही सरकारने उपलब्ध करून दिला असून पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम केले जात आहे.
मात्र या कामामध्ये प्रचंड अनियमितता सुरू असून काही आठवड्यांपूर्वी या किल्ल्याची निर्माणाधीन असलेली संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली. त्याठिकाणी आपण पाहणी करत असतानाच या संरक्षक भिंतीचा आणखी एक मोठा भाग आपल्या समक्ष खाली पडल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी सभागृहाला दिली. या घटनेने शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि सामान्य कल्याणकर नागरिकांमध्ये अतिशय संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे. आणि इतके महत्त्वाचे काम सुरू असतानाही महिनोमहिने त्याठिकाणी न येणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली.