नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
ठाणे /प्रतिनिधी – स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय अधिकारी होण्याचे कित्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मध्यमवर्गीय ,गरीब होतकरू मुलांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पश्चिमेकडील सहजानंद चौकात खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधीतून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले होते.मात्र हे केंद्र बंदच असून या केंद्रासाठी दिलेल्या एका मजल्यावर प्रशासनाकडून अभ्यासिका सुरु करण्यात आली होती. या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना महिनाभर २०० रुपयात अभ्यास करता येत होता मात्र आता चालविल्या जाणाऱ्या अभ्यासिकेचे खाजगीकरण करत फी वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
हातावर पोट असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ही वाढीव फी परवडणारी नसल्याने प्रशासनाने फी वाढ मागे घेत अभ्यासिकेच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करावा अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी व मनसे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांना भेटून हे खाजगीकरण तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच जर प्रशासन विद्यार्थ्यांना सेवा देण्यास सक्षम नसेल तर मनसे सेवा देईल मात्र हे खाजगीकरण रद्द करा अशी आग्रही मागणी या वेळी मनसेने देत आंदोलनाचा इशारा या वेळेस प्रशासनाला देण्यात आला आहे.