नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/ प्रतिनिधी – आपल्या जिवाची परवा न करता देशासाठी रक्त सांडण्याकरिता जवान नेहमी तयार असतो. देशातील नागरिकांना शांत झोप लागावी यासाठी ते डोळ्यात तेल घालून पहारा देतात. पण जवाणाच्या आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील जवानाला वीर मरण लाभले आहे. अरुणाचल येथे आपले कर्तव्य बजावल्यानंतर कमलेश कदम यांचा मृत्यू झाला. वीरजवान कमलेश कदम यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चेन्नई ते मुंबई हवाईमार्गाने तसेच मुंबई ते धुळे रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर धुळ्यातील महिंदळे, साक्री रोड येथे शासकीय इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेरगाव (अरुणाचल प्रदेश) येथील 73 बटालियन सशस्र सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाला वीर मरण आले. कमलेश ज्ञानेश्वर कदम असं या जवानाचं नाव आहे. शहीद जवान हा धुळे जिल्ह्यातील मूळचा गोराणे (ता. शिंदखेडा) येथील आहे. 14 मे रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृत्यू झाला. कमलेश हे कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे निवडणूक बंदोबस्तावर होते. कर्तव्य बजावून सुट्टी झाल्यानंतर ते आरामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कमलेश कदम यांना वीरमरण आल्याची बातमी त्यांच्या गावी कळताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ मोठी गर्दी केली. कमलेश कदम हे सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. नुकतेच ते धुळ्यात आले होते. आठवड्याभरापूर्वी ते ड्युटीवर गेले होते. मात्र पाच दिवसात त्यांच्या मृत्यूची बातमी गावात धडकल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन जुळी मुलं आहेत. कमलेश कदम यांच्या निधनानंतर त्यांची कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



