DESK MARATHI NEWS.
भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडी शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी रस्ता बंद केल्याच्या रागातून एका समाजकंटक युवकाने शिवीगाळ करीत हातात नंग्या तलवारी नाचवत हैदोस घातल्याची घटना घडली आहे.देविदास बाळाराम पाटील असे आरोपी समाजकंटकाचे नाव आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना खोणी गावातील सिद्धार्थनगर या वस्तीत सार्वजनिक जयंती साजरी करण्यासाठी सजावट देखावा करण्यात आला असून तेथे रविवारी रात्री शंभर सव्वाशे नागरिक एकत्र येऊन ऑर्केस्ट्रा वाद्य वाजवून आनंद साजरा करीत असताना देविदास पाटील हा त्या ठिकाणी बाईक घेऊन आला होता.तेथील रस्ता बंद असल्याने त्याने जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरवात केली.तेवढ्यावरच न थांबता घरी जाऊन देविदास हा पुन्हा दोन्ही हातात दोन तलवार घेऊन त्याठिकाणी दाखल झाला.त्यावेळी त्याने अनेकांवर वार करण्याचा प्रयत्न केला.तलवार नाचवत सर्वांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.
यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.यावेळी गावातील तरुण सागर पाटील याने देविदास यास पकडून त्याच्या हातातील तलवार काढून घेत परिस्थिती आटोक्यात आणली.या प्रकरणी स्थानिक रहिवाशी व भिवंडी मनपाचे सहा.आयुक्त बाळाराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून देविदास पाटील या विरोधात दहशत माजवण्या सोबत ॲट्रॉसिटी कायद्यान्वये निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिस या घटनेनंतर फरार देविदास पाटील याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून आंबेडकरी जनते कडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे