DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीतील अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक व रिक्षाचालक पुरते हैराण झाले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच नक्की कळत नसल्याने नगरिकांसह वाहनचालक मेटाकुटीला आले आहे. पावसाळा असल्याने रस्त्यातील खड्डे पालिका प्रशासन बुजवत नसल्याने वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्या अपघातात जर जीवितहानी झाली तर याची जबाबदारी पालिका प्रशासन घेणार का असा सवलाही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.यामुळेच प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचा जाब विचारत शुक्रवार 4 तारखेला रिक्षाचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवरील पालिकेच्या ‘ह’प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरील रस्त्यावर रिक्षाचालकांनी ठिय्या आंदोलन केले.
रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याने पलिका प्रशासनाला जाग आली. काही वेळाने अध्यक्ष राजा चव्हाण, सरचिटणीस भगवान मोरजकर, सचिव विजय गावकर व रिक्षाचालकांची पालिकेचे सहायक आयुक्त राजेश सावंत व महाजन यांनी भेट घेतली. महाराष्ट्रनगर व ज्या भागातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे त्या रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजविले जातील असे आश्वासन दिले.रिक्षाचालकांनी या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलन मागे घेतले.