DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – सरकारी काम बारा महिने थांब अशी म्हण आहे. या म्हणीनुसारच प्रशासनाचा कारभार चालतो असा अनुभव कल्याणच्या नागरिकांना आला आहे. वर्ष मागून वर्ष लोटले मात्र बाधितांना घरच मिळाले नाही. त्यामुळे सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे त्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे.कल्याण पश्चिमेतील पत्रिपुल गोविंदवाडी बायपास रोड वरील २००५ साली बाधित झालेल्या ११० कुटुंबाचे घरकुल प्रकरण आजही प्रलंबित असून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात विविध प्रश्नावर चर्चा करत कारवाई न झाल्याने २१ जुलै २०२५ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.यावेळी रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष आनंद नवसागरे,शहर अध्यक्ष दामू काऊतकर, कल्याण महिला अध्यक्ष रेखाताई गोडबोले,सागरताई मोरे,लक्ष्मीबाई आघम , छाया लांडे, कौसाबाई गायकवाड,महादेव काऊतकर,मुरली भोर इत्यादी मान्यवर कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे.
मागील १४ वर्षापासून रिपब्लिकन सेनेने केलेल्या मागण्यांमध्ये गोविंद वाडीतील बाधितांना घरकुल देणे, बी एस यु पी प्रकल्पांतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची कारवाई करणे, रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी रुग्णालयात सुधारणा करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे विस्तार करणे , तसेच पाणीपुरवठा खंडित झालेला भाग पुन्हा सुरळीत करणे या मुद्याचा समावेश आहे. यासह डंपर चालक पदासाठी अनुसूचित जातीतील उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.
रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष दामू काऊतकर, उपाध्यक्ष सुंदर काऊतकर यांनी स्पष्ट केले की,मागील १४ वर्षापासून ही मागणी प्रलंबित असून प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही.बीएसयुपी प्रकल्पात झालेल्या घरकुल वाटप प्रक्रियेत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला,या प्रकरणात घरकुल कुटुंबाला लाभ मिळेपर्यंत आणि दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे,दामू काऊतकर यांनी स्पष्ट केले आहे.या संदर्भात पावसाळी अधिवेशनात विरोद्याकांकडून ११० कुटुंबास घरकुल मिळण्यासाठी प्रश्न उपस्थित होणार का? सत्ताधारी सरकारकडून न्याय मिळेल का? असे विविध प्रश्न यावेळी उपस्थित राहीले आहे.