DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी-कल्याण आणि भांडुप परिमंडलात वीज वितरण यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. या कामांमुळे पावसाळापूर्व वादळवारा व मान्सुनच्या सुरुवातीला खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची तीव्रता कमी होण्यास मदत मिळेल. संबंधित भागातील वीज ग्राहकांना पूर्वकल्पना देणारे मेसेज त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून त्या-त्या भागात देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येत असून या कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
देखभाल-दुरुस्तीच्या कामातून वीज वितरण यंत्रणेची कार्यक्षमता व जीवनमान वाढण्यास मदत होते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साधारणत: एप्रिल आणि मे महिन्यात वीज वितरण यंत्रणेची कामे केली जातात. त्यानुसार कल्याण आणि भांडुप परिमंडलात यावर्षी तापमानाचा पारा चाळीशी पार झालेला असतानाही महावितरणचे कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि कंत्राटदाराचे (एजन्सी) कामगारांनी रणरणत्या उन्हात देखभाल-दुरुस्तीची कामे केली आहेत. देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी विभागनिहाय इनपॅनलमेंट एजन्सीची (कंत्राटदार) नियुक्ती करण्यात आली आहे. महावितरणचे नियमित कर्मचारी, बाह्यस्त्रोत (कंत्राटी) कामगार आणि एजन्सीच्या कामगारांकडून एकत्रितपणे देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.
देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये वीज वितरण रोहित्र (डीपी), उपकेंद्र तसेच उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांची कामे तसेच वीज वितरण यंत्रणेत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. सर्वेक्षणानंतर आवश्यक कामांची निवड करून स्वंयचलित एनडीएम प्रणालीत संबंधित काम व भागांची माहिती भरण्यात येते. त्यानुसार संबंधित भागातील वीज ग्राहकांना प्रणालीमार्फत वीज बंद ठेवण्यात येणाऱ्या कालावधीबाबत पूर्वकल्पना देणारे मेसेज त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवले जातात. कल्याण व भांडुप परिमंडलातील ग्राहकांनी देखभाल-दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामात सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.