गोवा/प्रतिनिधी – ऑक्टोबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेला 80 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय टपाल विभागाने संयुक्त राष्ट्र राजकीय विभाग, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने राष्ट्रव्यापी टपाल तिकीट डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे. “यूएन@80 आणि बहुपक्षीयता, जागतिक नेतृत्व आणि जबाबदारी यांद्वारे भविष्यासाठी भारताचे नेतृत्व” अशी या स्पर्धेची संकल्पना आहे. ही स्पर्धा 1 जुलै 2025 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत मायगव्ह(MyGov) पोर्टलवर घेतली जात आहे.
सीबीएसईसह सर्व राज्य शिक्षण मंडळांशी संलग्न शाळांना, 1 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत कोणत्याही दिवशी आपापल्या शाळेत ही स्पर्धा आयोजित करता येईल. इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी आणि कला महाविद्यालयांचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक शाळेतून निवडण्यात आलेल्या 5 सर्वोत्तम कलाकृती स्कॅन करून मायगव्ह पोर्टलवर अपलोड करावयाच्या आहेत.
डिझाईन ए4 आकाराच्या 200 जीएसएमच्या पांढऱ्या आर्ट शीटवर तयार करावे. त्यामध्ये क्रेयॉन्स, रंगीत पेन्सिली, जलरंग, अॅक्रेलिक रंग इ. चा वापर करता येईल.शाळा आणि कला महाविद्यालयांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या 80व्या वर्धापन दिनासाठी नावीन्यपूर्ण आणि आकर्षक टपाल तिकिट डिझाईन्स मिळवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.