DESK MARATHI NEWS NETWORK.
भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचे मूळ पोलिसांनी शोधून त्यावर कठोर कारवाई करावी, अशी सूचना माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे केली.भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी व त्यांचा भाऊ तेजस याची काही समाजकंटकांनी सोमवारी निर्घृणपणे हत्या केली. या हत्येने भिवंडी तालुक्यात खळबळ उडाली होती. माजी केंद्रीय राज्यमंत्री सोमवारी दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी भिवंडीत आज परतल्यानंतर तांगडी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांबरोबर बोलत होते.प्रफुल्ल तांगडी व तेजस तांगडी यांची झालेली निर्घृण हत्या ही दुर्देवी आहे. यापूर्वी साधारणत: महाविकास आघाडी सरकार असताना, २०२१ मध्ये दिवंगत प्रफुल्ल तांगडी यांच्यावर गोळीबार झाला होता. मात्र, त्यावेळी आरोपींविरोधात ठोस कारवाई झाली नाही. अन्यथा, ही घटना टळली असती, अशी भावना कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
या दोघा कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संवाद साधला असून, त्यांनी पोलिस प्रशासनाला कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत पोलिस उपमहानिरीक्षक व पोलिस अधीक्षक यांच्याबरोबरही चर्चा करून गुन्हेगारांच्या लवकरात लवकर अटकेची विनंती केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोप पकडले जातील, असा विश्वास वाटतो, असे ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून भिवंडी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचे मूळ पोलिसांनी शोधून काढून कडक कारवाई करावी, अशी सूचना कपिल पाटील यांनी केली.