DESK MARATHI NEWS.
पालघर/प्रतिनिधी – शुक्रवारी (२३ मे ) दिवसभर पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसाने वीज वितरण यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. परिणामी बाधित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करत अहोरात्र काम करून शनिवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी वीजुपरवठा सुरळीत केला. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी स्वत: उपस्थित राहत शनिवारी दिवसभर दुरूस्तीच्या कामांबाबत अत्यावश्यक निर्देश दिले.
शुक्रवारच्या वादळी पावसाने ३३ केव्ही विक्रमगड वीज वाहिनीवरील आठ खांब सावडे गावाजवळ जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे ३३/२२ केव्ही विक्रमगड उपकेंद्र शुक्रवारी सायंकाळपासून बंद आहे. या उपकेंद्रावरून निघणारे ११ व २२ केव्हीचे भोपोडी, चिल्लर, वाडा, हमरापूर, वासा उपकेंद्रवारील ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. तर मनोर गावाजवळ चार खांब तर जव्हार ते मोखाडा वीज वाहिनीचा एक खांब पडला होता. या आपत्तीत उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे एकूण ४० विजेचे खांब कोसळले होते. सोबतच विविध भागात वृक्ष उन्मळून पडल्याने व झाडांच्या फांद्या पडल्याने वीजवाहिन्या बाधित झाल्या होत्या.
मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा हे स्वत: शनिवारी सकाळपासून पालघरमध्ये ठाण मांडून आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी दुपारपासूनच शक्य तितक्या तातडीने दुरुस्तीचे काम करून बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचित करत प्रत्येक बाबींवर ते बारकाईने लक्ष ठेवून होते. विपरित परिस्थितही महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नोंदणीकृत कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी अविरत काम करत बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. ३३/२२ केव्ही विक्रमगड उपकेंद्राकडे जाणाऱ्या वीजवाहिनीचे सर्व खांब उभे करण्यात आले असून शनिवारी सायंकाळपर्यंत विक्रमगडचा वीजपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित आहे. नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.