नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – उन्हाळ्याची सुरुवात झाली कि प्रत्येकाला चटक लागते ती आंब्याची चव चाखायची. आंबा हा प्रत्येकाच्याच चवीचा विषय आहे. बाजारात गोड, रसरशीत आणि विविध जातींचे आंबे दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात येणाऱ्या हापूस आंब्याची मागणी ही देशासोबतच परदेशात वाढत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे ज्याला लोकांचाही भरगोस प्रतिसाद मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बुलढाण्याच्या कृषी विज्ञान केंद्र येथे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी एक दिवसीय भव्य ‘आंबा महोत्सव’ आंबा प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींची ओळख व्हावी या उद्देशाने हा आंबा महोत्सव आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवामध्ये केशर, पायरी, लंगडा, निलंम, राजपुरी, मल्लिका, रत्ना, तोतापुरी, हापूस, दसेरी, आम्रपाली व गावरान यासह अन्य प्रजातीचे 17 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला, प्रदर्शनी मध्ये उपस्थित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी या विविध प्रजातींच्या आंब्याची माहिती व चव घेतली. यावेळी अनेकांनी तर त्यांच्या पसंतीचे आंबे देखील खरेदी केले आहे. या आंबा महोत्सवाध्ये शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आंबा महोत्सवाचे उद्घाटन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले, तर अध्यक्षस्थानी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख हे होते.