नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या वतीने दरवर्षी वर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत महापुरुषांचे विचार तेवित ठेवण्याचे प्रामाणिक काम संस्थे व्दारे केले जाते.
महोत्सवाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नगररचना सहाय्यक संचालक दिशा सावंत यांच्या हस्ते होणार आहे. महापुरूषांच्या जीवनावर दुर्मिळ चित्र प्रदर्शन भरविण्यात आले असून त्याचे उद्घाटन शहर अभियंता अर्जुन अहिरे यांचे हस्ते होणार आहे. दुपारी ४ वाजता
आचार्य अत्रे रंगमंदिर येथे देशभक्तीपर व महापुरूषांच्या जीवनावर समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा खुली असल्याने आत्तापर्यंत २० गृपने समुह स्पर्धेसाठी नावे नोंदविलेली आहेत.
प्रबोधन सत्र व पुरस्कार वितरण सोहळा या सत्राचे उद्घाटन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याहस्ते होणार असून हे सत्र माजी महापौर रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच शासकीय अतिथी म्हणून उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजिज शेख आणि विशेष उपस्थिती केडीएमसी उपायुक्त वंदना गुळवे हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तसेच याच कार्यक्रमात ज्ञानसूर्य गुणवंत विद्यार्थी पुरस्कार दिला जाणार आहे.
प्रशासकीय कामामध्ये असून सुध्दा आंबेडकरी चळवळीसाठी जे योगदान अधिकारी, कर्मचारी यांनी दिले त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना योगदानाबद्दल आंबेडकरी शाहीरी पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच जनरल नॉलेज स्पर्धा व समुह नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना परितोषीक वितरण केले जाणार आहे. रात्री ८ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये “अभिवादन महापुरूषांना, विद्रोही शाहीरी महाजलसा” सादरकर्ते शाहीरी राजेंद्र कांबळे, सोलापूर यांचा पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी संस्थाध्यक्ष चंद्रकांत पोळ, जयंती समिती अध्यक्ष नागेश टोळ, प्रकाशन समिती उत्तम गायकवाड, कोषाध्यक्ष सूर्यभान कर्डक, श्रीकांत वाघमारे, हरिश्चंद्र जाधव, सुनील चाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



