नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – राज्यभरात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र दिसत आहे. एकीकडे मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या ठिकठिकाणी सभा सुरू आहेत, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून देखील सभा घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर भिवंडी येथील सोनाळे गावात ओबीसी समाजाची 17 डिसेंबरला सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी आज कल्याण मध्ये आरक्षण बचाव एल्गार समितीच्या वतीने एक बैठक घेण्यात आली.
या बैठकीत 17 डिसेंबरला होणाऱ्या सभेची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. या सभेसाठी ओबीसी नेते छगन भुजबळ ,पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती समितीचे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी दिली आहे. या सभेसाठी कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि आजूबाजूच्या परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.



