DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/ प्रमोद तांबे – राज्य परिवहन महामंडळ आणि विविध महापालिकांच्या बसगाड्या अपुऱ्या पडत असल्यामुळे ओला, उबरसारख्या खासगी प्रवासी वाहतूक सेवांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र, दर कपात, वाढती इंधन किंमत व कमिशनमध्ये तफावत यामुळे ओला-उबर चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काही चालकांनी अनपेक्षितरित्या संप पुकारला आहे.
या संपात अद्याप सहभागी न झालेल्या चालकांवरही दबाव आणण्यासाठी चालक संघटनांनी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. ज्या ओला-उबर चालकांनी संपात भाग घेतलेला नाही, त्यांचं कल्याण दुर्गाडी जवळ गांधीगिरीतून स्वागत करण्यात येत आहे.
ठाकरे गटाच्या वाहतूक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश भोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून चालकांच्या गळ्यात हार घालून, श्रीफळ देऊन सत्कार केला असून, “तुम्ही अजूनही प्रवासी सेवा देत आहात, आंदोलनात सहभागी व्हा,” अशी विनंतीही त्यांना भोर यांनी केली आहे.
या दरम्यान ठाकरे गटाच्या वाहतूक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश भोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून प्रवाशांना खाली उतरवलं असून, इतर वाहनांची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. परिणामी, प्रवाशांना मधेच गंतव्याकडे जाणं थांबवून दुसरं वाहन शोधावं लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे.