DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी– कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी आज आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्विकारताच त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. कल्याण डोंबिवलीत शिक्षण आरोग्यासह नागरिक केंद्रीत कारभाराला प्रथम प्राधान्य राहील असा विश्वास कल्याण डोंबिवलीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.
या अगोदर त्यांनी धुळे आणि हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून आणि लातूर जिल्हा परिषदेमध्ये सीईओ म्हणून त्यांनी काम केलेले आहे.पण यापेक्षा कल्याण डोंबिवली ही शहरे सर्वाधिक नागरीकरण झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर अगोदर आपल्याकडे क्षेत्रात कोणकोणत्या समस्या आहेत, त्याचबरोबर कोण कोणते प्रकल्प सुरू आहेत त्यांना गती देण्याचा आपला प्रयत्न असेल. तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासन लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने 100 दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये नागरिककेंद्रीत प्रशासकीय कामकाजासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारी असो की त्यांना मिळणाऱ्या सेवा. त्या अधिकाधिक गतीने, पारदर्शकपणे त्यांना कशा देता येतील यासाठी काही सिस्टम्स डेव्हलप करायचे आहेत. आज टेक्नॉलॉजीचे प्रमाणही वाढलेले असल्याने एआयचाही वापर करण्याचा आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.तर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असल्याने कल्याण डोंबिवलीतील पायाभूत सुविधा आणि इतर कामांवरही आपले विशेष लक्ष राहणार असल्याचे सांगत नवनियुक्त आयुक्त गोयल यांनी आपल्या कारभाराची दिशा यावेळी स्पष्ट केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त संजय जाधव आदी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.